इस्लामाबाद (वृत्तसंस्था) – पाकिस्तान यापुढेही जागतिक व्यासपीठावर काश्मीर मुद्दा मांडतच राहील, असे वक्तव्य त्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी केले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने दुर्लक्ष केले तरी काश्मीर मुद्द्यावरून इम्रान यांचा भारतविरोधी आकांडतांडव कायम राहणार असल्याचे सूचित झाले.
भारताने मागील वर्षी (5 ऑगस्ट) धडक पाऊल उचलताना जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केला. त्यामुळे काश्मीरवर वाकडी नजर असणाऱ्या पाकिस्तानची अस्वस्थता वाढली. भारताच्या महत्वपूर्ण निर्णयाला एक वर्ष झाल्याच्या दिवशी इम्रान यांनी पाकव्याप्त काश्मीरच्या विधानसभेला उद्देशून भाषण केले. काश्मीरमध्ये काय चाललेय ते जगातील अनेक नेत्यांना ठाऊक नव्हते. मात्र, पाकिस्तान सरकारच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण जगाने काश्मीर मुद्द्याची दखल घेतली आहे, असा दावा त्यांनी केला.
मी स्वत: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतर महत्वाच्या देशांच्या प्रमुखांशी बोललो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. नवा राजकीय नकाशा जारी करण्याच्या पाकिस्तानच्या खोडसाळपणाचेही त्यांनी जोरदार समर्थन केले.
काश्मीर आणि गिलगिट-बाल्टीस्तान आपला भाग असल्याचे भारताकडून दाखवले जात आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने नवा नकाशा आणल्याचे त्यांनी म्हटले. त्या नकाशात काश्मीर आणि गुजरातच्या जुनागडला पाकिस्तानचे भाग म्हणून दाखवण्यात आले आहे.
दरम्यान, काश्मीर मुद्द्यावर बोलणाऱ्या इम्रान यांनी आधी दिलेल्या कबुलीशी विसंगत भूमिका मांडली. भारताने मागील वर्षी जम्मू-काश्मीरविषयी महत्वपूर्ण पाऊल उचलल्यानंतर इम्रान यांनी शक्य त्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर थयथयाट केला.
मात्र, आंतरराष्ट्रीय समुदायाकडून थंड प्रतिसाद मिळाल्याची कबुली त्यांनी स्वत:च याआधी दिली होती. त्याचे कारण देताना त्यांनी पाश्चिमात्य देशांचे भारतात व्यावसायिक हितसंबंध गुंतले असल्याचे म्हटले होते.







