जळगाव (विशेष प्रतिनिधी)- जळगाव शहरातील आरटीओ कार्यालयात जिल्ह्यातून वाहन परवाना, वाहन,चालक लायसेन्स इ.नूतनीकरण्या सारख्या विविध कार्यालयीन कामकाजासाठी सातत्याने लोक येत असतात व दुर्तफा दोन चाकी, चार चाकी वाहने रस्त्याच्या कडेला जागा मिळेल अशा ठिकाणी बेशिस्तपणे उभे करून पार्किंग करीत असतात.

जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सरकारी निवासस्थानाच्या भिंतीला लागून महानगरपालिकेने ताब्यात घेतलेल्या मोकळ्या जागेत सर्वत्र खाजगी एजंट आपली वाहने उभी करून वाहनात आपली दुकाने उघडून आरटीओ संबंधित कामकाज मोठ्या प्रमाणे करतात. त्यांच्या गाडीच्या आजूबाजूला लोकांची फार मोठी गर्दी असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत असल्याने अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्यात यावा अशी मागणी जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विष्णू घोडेस्वार यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
मनपाच्या मोकळ्या जागेतील अनधिकृत खाजगी एजंटांचे अतिक्रमण हटवून दोन्ही बाजूंनी वाहनानी, खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अडवलेला मुख्य रस्ता नागरिकांसाठी सुरक्षित वापरास्तव तीन दिवसाच्या आत मोकळा करण्यात यावा अन्यथा न झाल्यास मनपाच्या महापौरांना घेराव व जनआंदोलन करण्याचा इशारा विष्णू घोडेस्वार यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, काव्यरत्नावली चौका पासून गणपती मंदिरापर्यंत रस्त्याच्याकडेला बेशिस्तपणे चारचाकी, दुचाकी, रिक्षा अशी वाहने मुख्य रस्ता अडवून उभी केलेली असतात तसेच स्टेट बँक कॉलनी पासून वनविभागाचे, गेट भाऊच्या उद्यानापर्यंत वाहने, गुटखा, पान, तंबाखू दुकाने खाद्यपदार्थ विक्रेते, एजंट छत्री लावून आपला व्यवसाय करीत असतात. परिणामी मुख्य रस्ता अतिक्रमण व बेशिस्तपणे वाहने पार्किंगमुळे आदर्श नगर, गणपती नगर, डी मार्टकडून येणार्या रहिवासी नागरिकांना वाहन चालवणे, पायी चालणार्या अबालवृद्धांना रस्ता शोधावा लागतो. किंबहुना त्यांना मुख्य रस्त्यावर चालण्यास रस्ताच नसतो. तशात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सरकारी निवासस्थानाच्या भिंतीला लागून मनपाच्या मोकळ्या जागेत विराजमान झालेले अनधिकृत एजंट , त्यांचे नोकर, वाहनधारक तयार झालेली कागदपत्रे आरटीओ कार्यालयात जमा करण्यासाठी धावपळीत रस्ता वरील डीवाईडर वरून उड्या मारून रस्ता ओलांडतात. त्यामुळे रस्त्यावरून चालणार्या , महिला वाहनचालक , पादत्री, ज्येष्ठ नागरिक यांना धक्का-बुक्की ला सामोरे जावे लागते. वाहने देखील पलटी होतात. प्रस्तुत प्रकार नित्याचेच झालेला दिसून येत आहे.
शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण असून नियमाच्या अधीन वाहनधारक, चालक, नोकर हे तोंडाला मास्क लावत नाहीत. प्रचंड गर्दी झाल्याने सोशल डिस्टंसिंगचा नियमही पाळला जात नाही. रस्त्यावर इतरत्र ठिकाणी पान, तंबाखू गुटखा, खाऊन थुंकलेले असते परिणामी रहिवासी नागरिक, जाणारी – येणारी नागरिकांच्या आरोग्याला धोका व संसर्ग होऊ शकतो. आरटीओ कार्यालयाला लागून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, वनअधिकारी इतर सनदी अधिकारी यांच्या निवासस्थानी असून प्रस्तुत गंभीर नागरी समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.







