पुणे (वृत्तसंस्था) – राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करावेत आणि इंधन भाववाढ नियंत्रणात आणावी, असं म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. पहिलं केंद्राला पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करण्यास सांगा, अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारलं.
पेट्रोल डिझेलचे दर दररोज वाढतायेत. दिवसेंदिस वाढणाऱ्या दराने आता पेट्रोल शंभरी पार करण्यासारखी स्थिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांच्या किंमती कमी असतानाही आपल्याकडे मात्र पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवारांनी फडणवीसांना फटकारलं.
“सेनेने मोर्चे काढण्याची नौटंकी करू नये. राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी. मागच्या काळात आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळीही पेट्रोल डिझेल दरवाढ झाली होती. त्यावेळी मी आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी पेट्रोल डिझेलवरचा राज्याचा कर कमी केला होता आणि पेट्रोल डिझेलचे दर 2 रुपयांनी कमी केले होते. आताच्या सरकारने पेट्रोल डिझेलवर कर कमी करावा आणि पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन दाखवावेत.”
राज्याच्या करापेक्षा केंद्राचा कर जास्त आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी केंद्राला पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करण्यास सांगावे, अशा शब्दात अजित पवार यांनी फडणवीस यांचा समाचार घेतला. यावेळी अजित पवार चिडलेले पाहायला मिळाले.
वाढत्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेन आज राज्यभर आंदोलन पुकारलं आहे. महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये शिवसेना कार्यकर्ते- नेते-पदाधिकारी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात सेना कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत.







