जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील रस्ता गांभीर्यपूर्वक न तयार केल्यामुळे पुन्हा एकदा पूर्ण खराब झाला आहे. त्यामुळे रुग्णांसह वाहनधारकांचे मोठे हाल होत आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी या रस्त्यांची पाहणी करून अधिकाऱ्यांना जाब विचारला होता.
जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील रस्ता हा पांडे डेअरी चौकापासून ते बेंडाळे चौकापर्यंत पूर्ण नवीन तयार करण्यात आला होता. या रस्त्यासाठी आम आदमी पार्टी, मनसे आदी पक्ष संघटनांनी आंदोलन केले होते. त्यांनतर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी रस्त्याची पाहणी करून नवीन करण्याबाबत सूचना केल्या होत्या.
त्यानंतर खडी, डाबर आदी साहित्य टाकून रस्ता नवीन बनवण्याचा प्रयत्न झाला. मात्र हे प्रयत्न प्रामाणिक न राहता वरवरचे राहिले. नव्याने टाकण्यात आलेली खडी पूर्णपणे उखडली असून वाहनधारकांना वाहन चालविताना त्रास होत आहे. रुग्णवाहिकेत रुग्णांना आणतानादेखिल अडचणी येताहेत. याकडे जिल्हाधिकारी, मनपा प्रशासन गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.