वॉशिंग्टन (वृत्तसंथा) – माध्यमांतील आकडेवारीनुसार, जगातील कोरोना रुग्णांची संख्या आता जवळपास 6.62 कोटींवर पोहोचली असून 4 कोटी 57 लाखहून अधिक लोक बरे झाले आहेत. तर 15 लाख 23 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीतील परिस्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर जात असल्याचे दिसू लागले आहे. येथे शुक्रवारी 993 जणांचा मृत्यू झाला. एवढेच नाही, तर येथे रुग्णालयातील बेडही कमी पडू लागले आहेत. तसेच यावेळी ख्रिसमस, बॉक्सिंग डे आणि न्यू इयर निर्बंधातच पार पडेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
युरोपातील देशांत जशी परिस्थिती मार्च आणि एप्रिल महिन्यात होती, साधारणपणे तशीच परिस्थिती पुन्हा एकदा तयार होऊ लागली आहे. फ्रान्स आणि जर्मनीने कठोर निर्बंध आणि लॉकडाउनच्या मदतीने काही प्रमाणात यावर नियंत्रण मिळवले आहे. मात्र इटलीत असे नाही. येथे शुक्रवारी 993 जणांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत एकूण 58 हजार जणांचा कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाला आहे. इटली सरकारने म्हटले आहे, की रुग्णालयांतील बेड कमी होत चालले आहेत. उत्सवांच्या काळात निर्बंध अधिक कठोर होतील आणि लोकांना घरी राहण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहावे लागेल.
कोरोनामुळे अमेरिकेतील स्थितीही पुन्हा एकदा खराब होताना दिसत आहे. ‘द गार्डियन’ने दिलेल्या एका वृत्तानुसार, येथे या आठवड्यात सरासरी रोज 1800 जणांचा मृत्यू झाला आणि एप्रिलनंतरची ही सर्वात धोकादायक स्थिती आहे. ज्यो बायडन यांनी ट्रम्प अॅडमिनिस्ट्रेशनवर आरोप केला आहे, की त्यांनी लशीच्या वाटपासाठी योग्य नियोजन केले नाही. यामुळे राज्यांना त्रास होत आहे. बायडन म्हणाले, माझ्या टीमला अद्याप सविस्तर प्लॅन मिळालेला नाही. आम्हाला लस आणि सिरिंज कंटेनर्सची वाट पाहावी लागत आहे. ट्रम्प यांच्या कोरोना टास्क फोर्समध्ये असलेल्या डॉ. अँथोनी फौसी यांनी आपल्या कोरोना टीमचा भाग व्हावे, असे आवाहन बायडन यांनी केले आहे. मात्र, फौसी यांनी यावर अद्याप कसल्याही प्रकारचे उत्तर दिलेले नाही.
ऑस्ट्रेलियामध्ये जनतेचा संयम आणि सरकारच्या उपाययोजनांचा परिणाम दिसू लागला आहे. न्यू साऊथ वेल्स आणि साऊथ ऑस्ट्रेलिया सर्वाधिक प्रभावित होते. मात्र, येथील स्थिती आता नियंत्रणात आहे. तर भारताचा विचार करता भारतात आतापर्यंत तब्बल 9608418 जणांना कोरोनाची लागण झाली असून 139736 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 9058003 जण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.







