ठेवीदारांसह दीपककुमार गुप्तांची पत्रपरिषदेत माहिती
जळगाव (प्रतिनिधी) – माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बीएचआर पतसंस्थेच्या ठेवीदारांना न्याय मिळूनदेण्यासाठी जे पाऊल उचलले आहे तसेच पाऊल त्यांनी वरणगावातील एकनाथराव खडसे ग्रामीण बिगर शेती सहकार पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी उचलावे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची मागणी ठेवीदारांसह माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेमध्ये पतसंस्थेत ठेवीदार उपस्थित होते. यात वरणगाव येथील रिक्षाचालक असलेले प्रकाश रघुनाथ चौधरी व यादव जगन्नाथ पाटील यांनी गावातील एकनाथराव खडसे ग्रामीण बिगर शेती सहकार पतसंस्थेत २००६ मध्ये ठेवी ठेवल्या होत्या. मात्र ही पतसंस्था बुडाली असून यात अनेकांच्या ठेवी बुडालेल्या आहे. ठेवींबाबत यादव पाटील यांनी काही वर्षांपुर्वी एकनाथराव खडसेंची भेट घेतली होती. परंतु माझा नकार असतांना देखील माझे पतसंस्थेला नाव दिले आहे. माझा या पतसंस्थेसोबत काही संबंध नसल्याचे खडसेंनी सांगितल्याचे यादव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यादव पाटील यांनी एकनाथराव खडसे ग्रामीण बिगर शेती सहकार पतसंस्था, धनवर्धीनी सहकारी पतसंस्था मर्यादीत, महात्मा फुले अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि, लोक कल्याण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादीत याठिकाणी ठेवी ठेवल्या होत्या. परंतु अद्याप त्यांना कुठल्याच पतसंस्थेकडून ठेवी परत मिळाल्या नाही. त्यामुळे नाथाभाऊंनी बीएचआरप्रमाणे या पतसंस्थाचा देखील पाठपुरावा करावा. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन न्याय मिळवून देण्याची मागणी ठेवीदारांनी केली.







