मुंबई (वृत्तसंस्था) – मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ अनिल अंबानींची इन्फ्राटेल खरेदी करणार आहे. या व्यवहारासाठी जिओला राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाने मंजुरी दिली. जिओच्या रिलायन्स इन्फ्राटेल रिझोल्युशन प्लॅनला मान्यता मिळाली आहे. अनिल अंबानींना कर्ज पुरवठा करणाऱ्यांनीही रिलायन्स इन्फ्राटेल रिझोल्युशन प्लॅनला सहमती दर्शवली आहे. विशेष म्हणजे कर्जदारांकडून प्लॅनला १०० टक्के पाठिंबा मिळाला आहे. यामुळे जिओचा इन्फ्राटेल खरेदी करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
अनिल अंबानी यांच्या समुहातील इन्फ्राटेल आणि रिलायन्स कॅपिटल या दोन मुख्य कंपन्या आणि त्यांच्या सहकंपन्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. रिलायन्स कॅपिटल कंपनीवर ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत २० हजार कोटी रुपयांचे कर्ज झाले.
कर्जाच्या ओझ्याखाली दबत असलेला अनिल अंबानी समूह स्वतःच्या कंपन्या विकून मिळणारे पैसे कर्जफेडीसाठी वापरत आहे. मुकेश अंबानींच्या जिओ कंपनीने इन्फ्राटेलची खरेदी केल्यास अनिल अंबानींना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
कोरोना संकटाच्या काळात भारतात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या जिओ कंपनीने सलग चार वर्ष वेगाने प्रगती केली. मात्र अलिकडे दरमहा जोडलेल्या नव्या ग्राहकांच्या बाबतीत एअरटेलने जिओला मागे टाकले. जिओला २०१६ पासून आतापर्यंत सुरू असलेल्या घोडदौडीत पहिल्यांदाच धक्का बसला. या धक्क्यातून सावरण्यासाठी आणि एअरटेल एकदम पिछाडीवर टाकण्यासाठी जिओ कंपनीला इन्फ्राटेलच्या खरेदीतून मोठा लाभ होणार आहे.
जिओने दूरसंचार उद्योगात दमदार प्रवेश करण्यासाठी फ्री इंटरनेट आणि फ्री कॉलिंग सेवा देण्याचा निर्णय घेतला. दीर्घकाळ कार्ड विकत घेणाऱ्यास फुकट सेवा देत जिओ कंपनीने दूरसंचार क्षेत्रात उलथापालथ केली. अनिल अंबानींच्या इन्फ्राटेलसह अनेक लहान-मोठ्या कंपन्यांची गणितं जिओच्या प्रवेशामुळे विस्कळीत झाली. सध्या दूरसंचार क्षेत्रात जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांचा संयुक्त वी ब्रँड या तीन मोठ्या खासगी कंपन्या आहेत. तसेच एमटीएनएल आणि बीएसएनएल या सरकारी कंपन्या कार्यरत आहेत. बाकीच्या कंपन्या बंद पडल्या आहेत अथवा आपला उद्योग बड्या कंपन्यांना विकून मोकळ्या झाल्या आहेत किंवा विकण्याच्या मार्गावर आहेत. यात कंपनी विकून दूरसंचार क्षेत्रातून बाहेर पडणार असलेल्यांमध्ये अनिल अंबानी यांचा समावेश होणार आहे. लवकरच मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ अनिल अंबानींची इन्फ्राटेल खरेदी करणार आहे.
सध्या जिओ कंपनीकडे ४०.४१ कोटी ग्राहक आहेत. ग्राहकांच्या बाबतीत देशात जिओ आघाडीवर आहे. अनिल अंबानींची इन्फ्राटेल खरेदी केल्यावर जिओ कंपनीला ४३ हजार टॉवर आणि १ लाख ७२ हजार किमी.ची फायबर लाइन तयार स्वरुपात मिळणार आहे. या एका व्यवहारामुळे जिओ दूरसंचार क्षेत्रात मोठी आघाडी घेणार आहे. तसेच इन्फ्राटेल कंपनीच्या विक्रीतून अनिल अंबानी ४ हजार कोटी रुपयांच्या कर्जाच्या ओझ्यातून स्वतःची सुटका करुन घेणार आहेत. एकरकमी मोठी कर्जफेड होणार आहे. याच कारणामुळे जिओ आणि इन्फ्राटेल यांच्यातील व्यवहाराला कर्ज देणाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.
सध्या देशातील २२ टेलिकॉम सर्कलमध्ये कार्यरत असलेली जिओ कंपनी मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे. इन्फ्राटेल खरेदी केल्यावर जिओ कंपनी भारतातील सर्वात बलाढ्य खासगी दूरसंचार कंपनी होणार आहे. जिओ आणि इतर कंपन्यांमध्ये मोठे अंतर पडणार आहे.







