नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. कोरोनाच्या या दुस-या लाटेने मनोरंजन विश्वातही तितकाच हैदोस घातला आहे. दरम्यान अनेक सेलिब्रिटीं व त्यांच्या कुटुंबाना कोरोनाची लागण झाली होती. तर अनेक सेलिब्रिटींनी आपला तसेच आपल्या अनेक प्रियजनांचा जीवही गमावला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आता ‘ड्रिम गर्ल’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री रिंकू सिंह निकुंभ हिचेही कोरोनाने निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. रिंकुची चुलत बहिण चंदा सिंह निकुंभ हिने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आयुषमान खुरानाच्या ‘ड्रिम गर्ल’ या चित्रपटात रिंकूने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

‘बॉलिवूड लाईफ’ने दिलेल्या वृृत्तानुसार, २५ मे २०२१ रोजी रिंकूचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. यानंतर ती पूर्णवेळ होम आयसोलेशनमध्ये होती. पण तिचा ताप उतरत नसल्याने तिला उपचारासाठी रूग्णालयात भरती करण्यात आले होते. पहिल्या दिवशी तिला सामान्य वॉर्डमध्ये भरती करण्यात आले. मात्र तिच्या तब्येतीत सुधारणा होत नाही हे पाहून तिला लगेच दुस-याच दिवशी आयसीयूमध्ये शिफ्ट केले गेले होते. रिंकू याआधीच दम्याच्या आजाराने ग्रस्त होती. अशात तिची प्रकृती आणखी बिघडली व तिने अखेरचा श्वास घेतला.







