पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्याची फसवणूक
जळगाव (प्रतिनिधी) : शेतात मोबाईल कंपनीचा टॉवर बसवण्याच्या आमिषाने पाचोरा तालुक्यातील एका खासगी नोकरदाराची तब्बल ३४ लाख ६३ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १ मार्च रोजी उघडकीस आला असून, जळगाव सायबर पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यातील बदरखे येथील निंबा गवा परदेशी (वय ५३) हे खासगी नोकरदार आहेत. दि. ६ जुलै २०२४ रोजी त्यांना मोबाईल कंपनीच्या ‘प्रोजेक्ट मॅनेजर’ अंकिता श्रीवास्तव हिने फोन केला. तिने सांगितले की, त्यांच्या शेतात मोबाईल टॉवर बसवण्यात येणार आहे आणि त्याबदल्यात त्यांना महिन्याला २० हजार रुपये भाडे मिळेल. पुढे अंकिता श्रीवास्तवच्या सहकाऱ्याने, राघव कुमार यानेही व्हॉट्सअॅपद्वारे परदेशी यांच्याशी चर्चा केली.
त्यांनी टॉवर बसवण्यासाठी काही अटी आणि शर्ती पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत, शासकीय कर भरण्याच्या नावाखाली वर्षभरात तब्बल ३४ लाख ६३ हजार रुपये उकळले. फसवणूक करणाऱ्यांनी ८ ते १० महिने झाल्यावरही टॉवर बसवला नाही. तसेच, घेतलेली रक्कम परत दिली नाही. अखेर दि. १ मार्च रोजी निंबा परदेशी यांना आपल्या फसवणुकीचा अंदाज आला आणि दि. ३ मार्च रोजी त्यांनी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार अंकिता श्रीवास्तव आणि राघव कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.