मुंबई (वृत्तसंस्था) – धाराशिव जिल्ह्यात आज 174 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा एक हजाराच्या पुढे म्हणजेच 1 हजार 163 एवढा झाला आहे. 514 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून 600 रुग्णांवर जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की, संभाजीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालय प्रयोगशाळा तसेच धाराशीव येथील विद्यापीठ उपकेंद्रातील कोविड तपासणी प्रयोगशाळेत मिळून 508 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील 503 तपासणी अहवाल जिल्हा रुग्णालयात प्राप्त झाले आहेत. यामध्ये 174 पॉझिटिव्ह, 250 निगेटिव्ह, 79 अनिर्णीत तर पाच अहवाल प्रलंबित आहेत. पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये धाराशिव तालुक्यात 49, तुळजापूर 35, उमरगा 47, कळंब 21, परंडा 6, लोहारा 2 तर वाशी तालुक्यात 14 रुग्णांची वाढ झाली आहे.
धाराशिव शहर कोरोना हॉटस्पॉट होत असून धाराशिव शहरातील रामनगर भागात 6, पोलीस लाईन, शाहूनगर, भीम नगर भागात प्रत्येकी दोन, बार्शी नाका 4, विद्यानगर 3 यासह शहरातील इतर विविध भागात रुग्णांची वाढ झाली आहे. उमरगा तालुक्यातील जकेकुर येथे 6, नगर परिषद समोरील भीम नगर भागात 8 रुग्ण आढळून आले आहेत. तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे 6, अणदुर येथे 11, तुळजापूर शहरात 6, नळदुर्ग येथे 3 रुग्ण आढळून आले आहेत. कळंब शहरातील सोनार गल्ली भागात 12, तालुक्यातील मंगरूळ येथे 6 रुग्ण आढळून आले आहेत. वाशी तालुक्यातील तेरखेडा या एकाच गावात 14 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून जिल्हावासियांच्या चिंतेत भर टाकणारा आहे. कोरोनाची आतापर्यंत आजची ही सर्वात मोठी वाढ आहे. जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्ण संख्या 1 हजार 163 एवढी झाली असून जिल्ह्यातील 514 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे तर 600 रुग्णांवर जिल्ह्यातील विविध विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यातील 49 रुग्णांनी आत्तापर्यंत आपला जीव गमावला आहे.







