मुंबई ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र उद्यापासून पूर्णपणे कोरोना निर्बंधमुक्त होत आहे. मास्क घालणं ऐच्छिक असेल, अशी माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
सर्व निर्बध मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हटवले आहेत. मंत्रिमंडळानं एकमताने हा निर्णय घेतला आहे. आगामी सण उत्साहात साजरे करण्यासाठी महाराष्ट्राला मोकळं केलं आहे. गुढीपाडव्याला शोभायात्रा जोरात काढा, असा संदेश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेटने महाराष्ट्राला दिला आहे. ज्या माणसाला मास्क लावावा असं वाटत असेल, तर लावावा. ज्या वाटत असेल की नाही लावावा, त्यांना लावू नये. कुठलंही बंधन आता राहिलेलं नाही, असे आव्हाड म्हणाले
महामारीत लावण्यात आलेले दोन महत्त्वाचे कायदे अखेर मागे घेण्यात आले आहेत. आता निर्बंध कोणतेही असणार नाही. राज्यातील कोरोनाचे निर्बंध मागे घेण्यात आले असले, तरिही प्रत्येकाला खबरादारी घ्यावी लागणारच आहेत. कुणीही बेजबाबादारपणे वागू नये. काळजी घेत राहावी लागणारच आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. अमेरिका, इंग्लड या देशांनी मास्कमुक्तीही केली आहे, पण आपण मास्क ऐच्छिक ठेवलेला आहे. शोभायात्रा आपल्याला साजऱ्या करता येतील. डॉ. बाबासाहेबांची जयंती आपण उत्साहात साजरी करु शकू. हा जो काही सातत्याने प्रश्न विचारला जायचा, त्या प्रश्नाला या निर्णयातून घोषणा केली आहे, असेही टोपे यांनी सांगितले. मार्च 2020 पासून राज्यात कोरोना निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर हळू हळू निर्बंधातून सूट देण्यात आले होते.