जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव आयएमएच्या सन २०२२ – २०२३ वर्षासाठी निवडण्यात आलेल्या नव्या कार्यकारिणीची पदग्रहण सोहळा येत्या ३ एप्रिलरोजी आयोजित करण्यात आला आहे . आयएमएचे राज्य अध्यक्ष डॉ सुहास पिंगळे , राज्य सचिव डॉ मंगेश पाटे , गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांच्यासह राज्य सदस्य डॉ अनिल पाटील व डॉ स्नेहल फेगडे यावेळी उपस्थित राहणार आहेत .
आयएमएच्या नव्या कार्यकारिणीचे अध्यक्ष नेत्ररोगतज्ज्ञ डॉ दीपक आठवले , सचिव अस्थिरोगतज्ञ डॉ जितेंद्र कोल्हे व त्यांचे सहकारी पदग्रहण करणार आहेत . डॉ जितेंद्र कोल्हे यांनी सांगितले की , आगामी वर्षात प्राधान्याने आम्ही डॉक्टर्स आणि रुग्ण यांच्यातील संबंध सुधारण्यावर भर देणार आहोत , त्यासाठी जनजागृती आणि अन्य उपक्रमांचा आमचा मनोदय आहे . डॉक्टरांच्या समस्यांसाठीहीही आम्ही काम करणार आहोत . खाजगी रुग्णालयांच्या घरपट्टी आणि अग्नी सुरक्षा परीक्षणाच्या जाचक नियमांच्या मुद्द्यांवर संबंधितांकडे जाणार आहोत . काही सामाजिक उपक्रम , व्याख्याने , वैद्यकीय ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी आयएमएच्या क्लिनिकल मीटिंग्ज , आरोग्य जागृतीचे उपक्रम राबवतानाच जळगावात डॉक्टरांसाठी अद्ययावत हेल्थ क्लब उभारण्याचाही आमचा संकल्प आहे .
आयएमएच्या नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष डॉ सुनील नाहटा , कोषाध्यक्ष डॉ पंकज पाटील , सहसचिव डॉ सुशीलकुमार राणे व डॉ धीरज चौधरी , जनसंपर्क अधिकारी डॉ विनोद जैन यांचा समावेश आहे .