भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहराजवळ एलसीबीच्या पथकाने मध्यप्रदेशातून येणारा तब्बल चार लाख रूपयांचा गुटखा जप्त करून दोघांना अटक केली आहे.

राज्यात गुटखा बंदी असताना जवळच्याच मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाची छुप्या मार्गाने वरणगाव व परिसरात आयात केली जाऊन त्याची चढ्या भावाने विक्री केली जात आहे. परिसरासाठी जणु काही वरणगांव हे गुटखा विक्रीचे मुख्य केंद्रच बनु पाहत आहे.
या अनुषंगाने मध्य प्रदेशातून चार चाकी क्रमांक एमएच १९ एपी- २११४ या कार मध्ये गुटखा येत असल्याची गुप्त माहीती जळगाव गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाल्याबरोबर हतनुर टहाकळी मार्गावर सापळा रचुन मध्य प्रदेशातून येणार्या गाडीची चौकशी करून तपासणी केली. यामध्ये त्यात सुमारे चार लाख रुपयाचा गोणीत भरलेला गुटखा आढळला असुन तो जप्त करण्यात आला आहे. आणि सर्व मुद्देमाल वरणगाव पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केला आहे. गुटखा घेऊन येणारी कार व संशयीत सुनिल माळी व विनोद चौधरी यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, अवैध गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असतांना अन्न व औषध प्रशासनातर्फे कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.







