जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील वृध्द महिलेचा धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी २९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत नशिराबाद पोलीसांनी दिलेली माहिती वरून, कैसाबाई भोई (वय-६५) या नशिराबाद येथील भोईवाडा येथे भावाच्या घरी राहायला होत्या. त्याचा भाऊ मयत झाल्याने त्यांचा भाचा अनिल झगडू भोई हे त्यांचा संभाळ करत होते. रविवारी २९ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता कैसाबाई भोई ह्या जळगाव ते भादली अप लाईन रेल्वे रूळावरील रेल्वे खंबा क्रमांक (४२६/१६ ते १४) दरम्यान वरून जात असतांना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यासंदर्भात रेल्वेगाडी चालकाने जळगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना माहिती दिली. त्यानंतर घटनेची माहिती नशिराबाद पोलीस स्टेशनला देण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. सोमवारी ३० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन करीत आहे.