नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जगात करोनाचे एकीकडे तांडव सुरु आहे तर दुसरीकडे या महामारीला रोखण्यासाठी लसीकरणाची मोहीम जगातील बहुतांश देशांनी सुरु केली आहे. दरम्यान, भारतात ही मोहीम कधी सुरु होईल याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. याच लसीकरणाविषयी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

जगातील सर्वात मोठी करोना लसीकरण मोहीम राबवण्याच्या दृष्टीने भारतात तयारी सुरु असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. लसीकरणाची तयारी सध्या शेवटच्या टप्प्यात असून लोकांना भारतात निर्मिती झालेल्या लसीचा डोस मिळेल असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. गुजरातमधील राजकोटमध्ये एम्स रुग्णालयाच्या भूमीपूजनावेळी ते बोलत होते.
‘देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या सध्या कमी होत चालली आहे. आम्ही जगातील सर्वात मोठी करोना लसीकरण मोहीम राबवण्याची तयारी करत आहोत,’ असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. ‘२०२० ने आपल्याला आरोग्य हीच संपत्ती आहे हे चांगलेच शिकवलं आहे. हे वर्ष अनेक आव्हानं घेऊन आलं,’ असंही ते म्हणाले.पुढे ते म्हणाले की, ‘भारत जागतिक आरोग्याचे मुख्य केंद्र म्हणून उदयास आलं आहे. २०२१ मध्ये आपल्याला आरोग्य सेवेसाठी भारताची भूमिका बळकट करावी लागेल’.
नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसवरही निशाणा साधला. ‘२०१४ मध्ये आपलं आरोग्य क्षेत्र वेगळ्याच दिशेला होतं. वेगवेगळ्या दृष्टीकोनातून काम केलं जात होतं. प्राथमिक आरोग्य केंद्राचाही वेगळीच प्रणाली होती. गावात योग्य सुविधा मिळत नव्हत्या,’ असे नरेंद्र मोदींनी म्हटले.
‘भारताने योग्य वेळेत पाऊलं उचलल्याने आज आपण चांगल्या स्थितीत आहोत. १३० कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात एक कोटी लोकांनी करोनाविरोधातील लढाई जिंकली आहे,’ असे नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. ‘२०२० मध्ये करोनामुळे निराशा होती. चारही बाजूला अनेक प्रश्न होते. पण आता २०२१ नवी आशा घेऊन येत आहे,’ असे नरेंद्र मोदींनी म्हटले.







