मुंबई (वृत्तसंस्था) – यवतमाळ , जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील कोडुर्ली येथे कुलरचा शॉक लागून तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिया गजानन भूसेवार (वय ८), मृणाली गजानन भूसेवार (वय ६), संचिता गजानन भूसेवार (वय ४) अशी या बहिणींची नाव असून, आज सकाळी (गुरुवारी) ९.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या तिघींचे वडील शेतात फवारणीसाठी, तर आई निंदणासाठी गेली होती. घरी तिघी बहिणीचं होत्या. त्या जेवणासाठी एकत्र बसल्या. त्यावेळी रिया कुलर लावण्याकरता गेली असता तिला कुलरमधून विजेचा जबर झटका बसला. म्हणून तिला वाचवण्याकरिता संचिता व मृणाली या पुढे गेल्या. त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामध्ये तीनही बहिणींचा जागीच मृत्यू झाला.
ही गोष्ट घराजवळील एका आजीबाईंना समजताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर शेजारी घटनास्थळी धावून आले. घटनेची माहिती राळेगाव तहसीलदार आणि पोलिसांना कळवण्यात आली. तलाठ्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. दरम्यान, तीन सख्ख्या बहिणींच्या मृत्यूमुळे कोडुर्ली गावावर शोककळा पसरली आहे.