मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून ‘समृद्ध ग्रामपंचायत अभियान’ प्रभावीपणे सुरू
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील ग्रामपंचायती सक्षम, स्वयंपूर्ण व समृद्ध व्हाव्यात, तसेच गावांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित व्हावा, या उद्दिष्टाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून ‘समृद्ध ग्रामपंचायत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील निवडलेल्या ३०० ग्रामपंचायतींमध्ये सोमवार दि. ३० जून रोजी भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.
या उपक्रमाची औपचारिक सुरुवात धरणगाव तालुक्यातील मुसळी गावातून मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, गट विकास अधिकारी किशोर वानखेडे, ग्रामस्थ व विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक सोमवारी गावात स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून ३० जून रोजी एकाच दिवशी जिल्ह्यातील ३०० गावांमध्ये एकत्रित स्वच्छता मोहीम पार पडली. स्वच्छतेबरोबरच ‘एक पेड माँ के नाम’ या विशेष उपक्रमांतर्गत वृक्षारोपणही करण्यात आले. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाबरोबर मातृस्मरणही साधले गेले.
अभियानांतर्गत राबविले जाणारे महत्त्वाचे उपक्रम
• लोकाभिमुख व पारदर्शक ग्रामप्रशासन
• ग्रामपंचायतींच्या वेबसाईटचे अद्ययावतरण
• सीसीटीव्हीच्या माध्यमातून पारदर्शक कारभार
• कार्यालयीन दप्तरीकरण व नोंदवही अद्ययावत करणे
• ग्रामसभांचे प्रभावी आयोजन
• दिव्यांग व विशेष घटकांची माहिती अद्ययावत करणे
• ग्रामपंचायत स्तरावरील तक्रार निवारण प्रभावीपणे राबविणे
या अभियानामुळे गावांचा सर्वांगीण विकास, प्रशासनाची कार्यक्षमता आणि ग्रामस्थांची समाधानकारक सेवा या तिन्ही बाबींना बळ मिळणार आहे.