सावदा, ता. रावेर ( प्रतिनिधी ) – शहरात काल रात्री जमावाने दुचाकी आणि चारचाकींची तोडफोड केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या सतर्कतेने तातडीने वातावरण शांत झाले आहे.
सावदा शहरात काल रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास सुमारे चार-पाचशे जणांच्या जमावाने आकस्मीकपणे गांधी चौक, चांदणी चौक आदी भागांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड केली. अवघ्या काही मिनिटांमध्ये धुडगुस घालून हा जमाव तेथून निघून गेला. यात दोन चारचाकी आणि तीन दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर जमावाने काही दुकानांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकाराची माहिती मिळताच सावदा पोलीस स्थानकाचे एपीआय देविदास इंगोले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जिल्हा मुख्यालयातून अतिरिक्त कुमक देखील मागविण्यात आली आहे. दरम्यान, हा प्रकार नेमका कशामुळे घडला ? याची माहिती मिळालेली नाही. तथापि, सोशल मीडियातील एका पोस्टमुळे संतप्त झालेल्या जमावाने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीसांनी वेळीस घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला असून शहरातील वातावरण लागलीच निवळले. दरम्यान, सावदा शहरातील स्थिती नियंत्रणात असून कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.