जळगाव ( प्रतिनिधी ) – नवीपेठ भागात मध्यरात्री चोरट्यांनी बंद घराच्या लोखंडी खिडकीचे गज वाकवून दागिने व रोकड असा 15 ते 20 लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवीपेठ परिसरात पत्र्या हनुमान मंदिर समोर बॉम्बे लॉजच्या गल्लीत राजू गोविंद अग्रवाल (वय-५२) हे परिवारासह राहतात. मोबाईल रिपेअरिंग करून ते उदरनिर्वाह भागवतात. २४ मार्च रोजी ते दुपारी पुणे येथे मुलगा अखिल अग्रवाल याच्याकडे गेले होते. तत्पूर्वी त्यांची बहीण सुरेखा नंदू भावसार या दुबई येथे मुलाकडे जाणार असल्याने त्यांनी दागिने राजू अग्रवाल यांच्या घरी ठेवले होते.
राजू अग्रवाल यांच्या घराच्या शेजारीच रेल्वेची हद्द असून त्याठिकाणी रेल्वेचे एक जुने ऑफिस देखील आहे. चोरट्यांनी रेल्वेच्या बाजूने येत लोखंडी खिडकीचे गज वाकवून काचेची खिडकी फोडत घरात प्रवेश केला. कपाट फोडत मंगळसूत्र, नेकलेस, मोतीहार, बारा कानातले, सोन्याचे तुकडे, २ अंगठी, ३ सोन्याचे शिक्के, चैन असा ३० तोळे दागिने आणि देव्हाऱ्यात ठेवलेले ८ हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला. हा प्रकार आज सकाळी हे कुटुंबीय घरी आल्यावर उघडकीला आला आहे.
पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड, उपनिरीक्षक जगदीश मोरे, सर्जेराव क्षीरसागर, योगेश बोरसे, योगेश पाटील, रतन गिते, तेजस मराठे, प्रणेश ठाकूर, मोरे यांच्यासह एलसीबीचे विजयसिंग पाटील, राजेश मेढे, संजय हिवरकर, अक्रम शेख, अविनाश देवरे यांनी घटनास्थळी पंचनामा केला.