जळगाव ( प्रतिनिधी ) – स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित व जोशी बंधू ज्वेलर्स प्रायोजित ‘सुस्वागतं रामराज्यं’ या नृत्य- नाटिकेचे आयोजन छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर येथे २ एप्रिलरोजी संध्याकाळी ७ ते ९.३० या वेळेत करण्यात आले आहे.
नृत्य -कीर्तनाचा संगम असलेली ही नृत्य नाटिका अक्षय आयरे ( दहिसर, मुंबई ) यांनी दिग्दर्शित केली असून त्यांच्यासह १७ शिष्यांचाही या सादरीकरणात समावेश आहे. या कार्यक्रमाला डॉ. भवरलाल व कांताबाई जैन फाऊंडेशनचे सहकार्य लाभले आहे.
रामकथा युगानुयुगे सुरूच राहिल अशी सामर्थ्यवान आहे. ग. दि. माडगूळकर यांच्या प्रतिभेतून जन्मलेल्या अजरामर रचनांना सुधीर फडके यांनी संगीत देऊन गीतरामायण घराघरात पोहोचविले हेच गीत रामायण या नृत्य नाटिकेचा मूळ गाभा आहे. कीर्तन आणि नृत्य या दोन्ही भारतीय कला परंपरांचा संगम या नृत्य नाटिकेत आहे. पद्मभूषण गुरु डॉ पद्मा सुब्रमण्यम यांनी पुनरुज्जीवित केलेली ‘भरत नृत्यम्’ ही नाट्य शास्त्रावर आधारित मार्गी नृत्यशैली हे याचे वैशिष्ट्य आहे. हिंदुस्तानी गायन शैलीतील गीते व दक्षिण भारतीय शास्त्रीय नृत्याची जोड असे स्वरूप रसिकांना मोहिनी घालते.
या कार्यक्रमाच्या सशुल्क सन्मानिकेसाठी दिपिका चांदोरकर, “दिपज्योत”, महात्मा गांधी मार्केट समोर, जळगाव. मोबाईल नं. 9823077277. यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे .