इतर दोघांचाही लक्षणीय सहभाग
जळगाव (प्रतिनिधी) – दिल्ली येथील ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया संस्थेच्या राष्ट्रीय मॅरेथॉन चॅम्पियनशिप – २०२२ स्पर्धेत जळगावातील तिघा महिलांनी सहभाग नोंदवित लक्षणीय कामगिरी केली आहे. यात ६१ वर्षीय विद्या बेंडाळे यांनी ५५ वर्षानंतरच्या वयोगटात सहभागी होऊन ४२ किलोमीटर धावत पहिला क्रमांक मिळवित कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया संस्थेतर्फे राष्ट्रीय मॅरेथॉन चॅम्पियनशिप २०२२ हि स्पर्धा २७ मार्च रोजी भरविण्यात आली होती. स्पर्धेत जळगावातील ऍक्क्युपंक्चर उपचार तज्ज्ञ प्रतिभा कोकंदे, डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयातील लिपिक विद्या बेंडाळे, गृहिणी कविता पाटील यांनी सहभाग नोंदवला होता. यात प्रतीभा कोकंदे यांनी ३ तास २० मिनिटात २१ किलोमीटर धाव घेऊन तर कविता पाटील यांनी ५ तास २३ मिनिटात ४२ किलोमीटर धाव घेत स्पर्धेत लक्ष वेधून घेतले.
यासह विद्या बेंडाळे यांनी वय ६१ असूनही ५५ वर्षे वयोगटानंतरच्या गटात सहभाग घेत ५ तास १४ मिनिटात ४२ किलोमीटर धाव घेऊन प्रथम क्रमांक मिळविला. यामुळे विद्या बेंडाळे यांचे वय व कामगिरी पाहता त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीचे कौतुक करण्यात आले. विद्या बेंडाळे यांनी मागील ५ वर्षांपासून खान्देश रन पिंकेथॉन यासह विविध मॅरेथॉन शर्यतीत उत्साहाने सहभाग नोंदविला आहे. यामुळे जळगावकरांचे नाव दिल्लीत पुन्हा एकदा गौरवाने घेतले गेले. विद्या बेंडाळे, प्रतिभा कोकंदे, कविता पाटील हे जळगाव रनर्स ग्रुपचे सदस्य असून त्यांना स्पर्धेसाठी अध्यक्ष किरण बच्छाव, डॉ. सोनाली महाजन, वेदांती बच्छाव यांचे मार्गदर्शन मिळाले.
” महिलांनी क्रीडा क्षेत्रात पुढे येऊन आपली आवड जोपासावी. शारिरीक तंदुरुस्तीवर भर द्यावा. रनिंगसाठी रविवारी सागर पार्कवर मोफत प्रशिक्षण दिले जाते.त्यामुळे महिलांना योग्य संधी मिळून तंदुरुस्ती लाभेल. अशामुळे अनेक आजारांनाही दूर ठेवता येते.” – प्रतिभा कोकंदे