मुंबई ( प्रतिनिधी ) – काँग्रेस आमदारांची अंतर्गत धुसफूस पुन्हा बाहेर आली आहे. आता काँग्रेसच्या जवळपास 25 आमदारांनी थेट सोनिया गांधी यांना पत्र लिहीत भेटीसाठी वेळ मागितला आहे. हे आमदार काँग्रेसच्याच मंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार संकटात आहे की राज्यात काँग्रेसच संकटात आहे? असा सवालही केला जाऊ लागला आहे.
नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरूनही उलटसुलट चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्य काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीतही काँग्रेस नेत्यांचा नाराजीचा सूर कायम असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे आमदार आणि काँग्रेसचे मंत्री यांच्यातच चांगला समन्वय नसल्याची तक्रार काही आमदरांची असल्याच्याही चर्चा आहेत. त्यामुळे आता सोनिया गांधी यांच्या निर्णयाकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
काँग्रेस आमदारांच्या या पत्राबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता, हा नाराजीचा भाग नाही. काँग्रेस आमदार केलेल्या कामबाबत सोनिया गांधी यांना माहिती देतील, असे सावध उत्तर नाना पटोले यांनी दिली आहे.नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्याचीही माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल आहे का? असा सवाल सहाजिकच उपस्थित होत आहे. आधीही अनेकवेळा निधी आणि महामंडळाच्या वाटपावरून काँग्रेसची खदखद बाहेर आली आहे.
एकिकडे भाजपकडून रोज सरकार पडण्याच्या नव्या तारखा देण्यात येत आहेत. तर हेच सरकार पाच वर्षे टीकणार असा दावा सतत महाविकास आघाडीचे नेते करत आहे. मात्र अशात काँग्रेसची ही खदखद पुन्हा बाहेर आल्याने नेमकं संकट कुणावर आहे? असा सवाल उपस्थित झाला आहे.