मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबई – पुणे महामार्गावरील एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये एक गाडी बंदुक दाखवून ट्रकला ओव्हरटेक करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या गाडीच्या मागच्या काचेवर शिवसेनेचे वाघाचे चिन्ह आहे. हा व्हिडीओ एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी ट्विटरवरुन शेअर केला होता. हाच व्हिडीओ शेअर करत भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला प्रश्न विचारला आहे.
चालत्या गाडीतून पिस्तुल दाखवत दादागिरी, गुंडगिरी करणारे कोण? चारचाकी गाडीवर शिवसेनेचे स्टिकर, ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील आहे. शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स आहे की काय महाराष्ट्रमध्ये? असा प्रश्न निलेश राणे यांनी शिवसेनेला विचारला आहे.
दरम्यान, इम्तियाज जलील यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ट्रकच्या गर्दीमधून वाट काढण्यासाठी एक कारचालक ड्रायव्हिंग सीटवरुन उजव्या हातात पकडलेली रिव्हॉलव्हर गाडीच्या खिडकीबाहेर काढतो आणि ट्रकच्या रांगेमधून पलीकडच्या लेनमध्ये जाताना दिसतो. या गाडीच्या मागच्या काचेवर शिवसेनेचा लोगो असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे इम्तियाज जलील यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.