नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- केवळ काही आठवड्यांत लस उपलब्ध होण्याची शक्यता वाढली असतानाच प्रथम लस कोणाला द्यायची याबाबत विचारविनिमय सुरू झाला आहे.
देशात गेल्या सहा महिन्यांपासून करोनाव्हायरस अस्तित्वात आहे. त्यामुळे अनेकांना त्यांचा संसर्ग होऊन प्रतिकार करण्यासाठी त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांच्या शरीरात करोनाशी लढा देण्यासाठी अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत, अशांना प्रथम लस देण्याऐवजी ज्यांच्या शरीरात अशा अँटीबॉडीज नाहीत, अशा नागरिकांना प्रथम लस देण्याच्या शक्यतेवर विचार करण्यात येत असल्याचे बोलले जाते.
लस विकसित करण्याबरोबरच लसीच्या वितरणाकडे लक्ष देण्यासाठी केंद्र सरकारने निती आयोगाच्या नेतृत्वाखाली एक कृती नेमली आहे. ही समिती याकडे राष्ट्रीय पातळीवर काटेकोरपणे लक्ष देण्याची शक्यता आहे.
सेरो प्रेव्हलन्स चाचण्याची शक्यता…..
कोणाच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत आणि कोणाच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झालेल्या नाहीत, याची चाचणी सेरो प्रेव्हलन्स चाचणीद्वारे केली जाते. अशा प्रकारची चाचणी देशभरात घ्यावी लागणार आहे. मात्र, अशी चाचणी घ्यायची की नाही या संदर्भातील स्पष्ट निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, त्यात शक्यतेवर विचार करण्यात येत आहे.