मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या गेल्या महिन्याभरापासून झपाट्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, सरकार व्यापक स्तरावर ‘ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट’ धोरण राबवत असल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय असा दावा केला.
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना टोपे यांनी हे वक्तव्य केलं असून राज्य सरकार सध्या कोरोनाविरोधातील लढ्यासाठी सज्जता व कोरोनाबाबतची जनजागृती या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून आहे, असंही ते म्हणाले.
‘आम्ही सध्या ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या ४ ‘टी’वर व्यापक स्तरावर काम करत आहोत. राज्यात कोव्हीड – १९ चाचण्यांसाठीच्या ४०० लॅब्सच्या माध्यमातून आम्ही दिवसाला ५० हजार चाचण्या करत आहोत. अँटीजेन व आर-टी पीसीआर चाचण्या पूर्ण क्षमतेने सुरु आहेत.’
‘अनेक निर्बंध हटवण्यात आल्याने गेल्या महिन्याभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे,’ असंही ते म्हणाले.
‘मुख्यमंत्री उद्गाराव ठाकरे हे अनलॉकबाबतचे निर्णय अत्यंत सावधगिरी बाळगून घेत आहेत. आम्ही काही नियम शिथिल केले असले तरी, अद्याप प्रार्थना स्थळे, थिएटर्स, मॉल्स आणि जिम्सना परवानगी दिलेली नाही.’
राज्याचा कोरोना मुक्तीचा दर सध्या ८० टक्के असून मृत्यू दर २.४ टक्क्यांच्या आसपास आहे. दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही नव्या बाधितांएवढीच असल्याने रुग्णांना बेड्सची कमतरता भासत नाही, असा दावाही त्यांनी केला.
‘आम्ही कोरोनाचा सामना करण्यासाठी जम्बो कोव्हीड रुग्णालये व इतर आरोग्य विषयक सुविधांसह सज्ज आहोत. मात्र नव्या बाधितांच्या संख्येमध्ये कोरोनमुक्तांच्या संख्येपेक्षा अधिक वाढ होऊ नये यासाठी आम्ही अनलॉकची प्रक्रिया धीम्या गतीने राबवत आहोत.’