एकनाथराव खडसे यांच्याकडून पक्षाच्या धोरणाचे सूतोवाच

जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेच्या अध्यक्षांची आज झालेली निवड एका वर्षासाठी आहे. ३ वर्षात राष्ट्रवादीकडून तिघां संचालकांना जिल्हा बँक अध्यक्षपदाची संधी दिली जाणार आहे , असे पक्षाचे धोरण आहे असे सूतोवाच आज राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी केले . ही माहिती देताना ते आज दुसऱ्यांदा थोडे घसरले आणि त्यांनी राष्ट्रवादी नंतर अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीला दिले जाणार असल्याचे सांगून टाकले ! भाजपमध्ये झालेला त्रास जिव्हारी लागला असल्याचे ते जाहीरपणे सांगतातही ; मात्र काल आणि आज त्यांचे हे चुकून बोलले गेलेले शब्द घाव कसे खोलवर आहेत याची प्रचिती देणारे असावेत.
एकनाथराव खडसे यांच्या या विधानामुळे गुलाबराव देवकर यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद सुरुवातीच्या एका वर्षासाठीच मिळाले असल्याचे स्पष्ट झाले आहे
तोट्यात गेलेली ही बँक उर्जितावस्थेत आणण्याचे काम गेल्या सहा वर्षात झाले आता पुढेही त्याच पद्धतीने सदैव प्रगतीचा विचार केला जाईल असे ते म्हणाले. गुलाबराव देवकर आणि एकनाथराव खडसे यांनी जिल्ह्याच्या राजकारणात आता एकमेकांशी जुळवून घेतले आहे हे ही जिल्हा बँकेतील घडामोडींवरून आता स्पष्ट झाले आहे.







