पाचोरा (प्रतिनिधी) – आ.किशोर पाटील यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून आमदार स्थानिक विकास योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक सहाय्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या कमाल खर्च मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय अखेर शासनाने घेतला आहे. आता वार्षिक केवळ दहा लाख रुपयांऐवजी तीस लाख रुपये खर्च मर्यादा करण्यात आली असून नुकताच याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला आहे.या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो दिव्यांग बांधवांना आता आवश्यक सहाय्यक साहित्य उपलब्ध होणे सुलभ होणार आहे.
सहायक साहित्यासाठी नोंदणी केलेल्या दिव्यांग व्यक्तींची संख्या व आवश्यक सहाय्यक साहित्यांची संख्या विचारात घेता ते शासनाने निर्धारित केलेल्या दहा लाख रुपये खर्चात बसणे शक्य नसल्याने यात वाढ करून सदर रक्कम तीस लाख रुपये करण्याची आग्रही मागणी आ.किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली होती. दरम्यान शासनाने त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन याबाबचा शासन निर्णय जाहीर करून खर्च मर्यादा दहा लाखावरून तीस लाख रुपये केली आहे.
आमदार किशोर पाटील यांच्या या पाठपुराव्यामुळे राज्यभरातील लाखो दिव्यांग बांधवांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. सहाय्यक साहित्य तपासणी शिबिरात नोंदणी केलेल्या भडगाव तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना सुमारे १० लक्ष रुपयांच्या साहित्याचे यापूर्वीच वाटप झाले असून आता लवकरच पाचोरा तालुक्यातील तपासणी शिबिरात नोंदणी केलेल्या दिव्यांग बांधवांना सहाय्यक साहित्यांचे वाटप लवकरच होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.