चोपडा (प्रतिनिधी) – तालुक्यातील विरवाडे येथे किरकोळ वादातून एका तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौघं संशयित आरोपींना अटक केली आहे.
भोजू वासुदेव कोळी (वय ३२) असे मयत तरुणाचे नाव आहे. वासुदेव सोमा कोळी यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी रात्री ८:३० ते ९ वाजेच्या दरम्यान विरवाडे गावी सबस्टेशन जवळ तसेच त्यांच्या घरासमोरील अंगणात संशयित आरोपी सागर देविदास कोळी, दिपक सुभाष कोळी, कैलास गुलाब कोळी, मनोहर संतोष कोळी आणि शोभावाई देविदास कोळी (सर्व रा. विरवाडे ता.चोपडा) यांनी संशयित आरोपी दिपक कोळी व भोजु कोळी यांचा एकमेकांना धक्का लागल्याच्या कारणावरुन वाद घालायला सुरुवात केली. सर्व संशयित आरोपींनी भोजू कोळी व राजेद्र कोळी यांना शिवीगाळ, दमदाटी तसेच धक्काबुक्की केली. त्यानंतर संशयित आरोपी सागर कोळी याने राजेंद्र कोळी याच्या कपाळावर दगड मारुन डोके फोडुन दुखापत केले.
या भांडणाचा राग धरून नंतर सागर कोळी व संशयित महिला आरोपी शोभाबाई कोळी यांनी वासुदेव कोळी यांच्या घरासमोर भोजू कोळी यास शिवीगाळ करून दमदाटी तसेच चापटा बुक्यांनी मारहाण केली. तर सागर कोळी याने त्याच्या जवळील चाकूने भोजू कोळी याच्या मानेजवळ तसेच पाठीवर व इतर ठिकाणी भोसकून गंभीर दुखापत केले. जखमी अवस्थेत भोजु कोळी याला चोपडा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास स.पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले हे करीत आहेत. पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेत गुन्ह्यात वापरलेला चाकू देखील जप्त केला आहे.