जळगाव ( प्रतिनिधी ) – कासमवाडी भागातल्या मैदानावर काल रात्री एका २७ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे आज सकाळी उघडकीस आले सागर वासुदेव पाटील असे मयताचे नाव असून तो एका खुनाच्या गुन्ह्यात संशयित असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना दोन संशयितांची नावे समजली असून त्यांचा शोध सुरू आहे.
ईश्वर कॉलनी परिसरात सागर पाटील कुटुंबियांसह राहत होता.मजुरी करीत होता. काल रात्री तो नेहमीप्रमाणे घरी आला. रात्री १ वाजेच्या सुमारास त्याला कुणीतरी बोलवायला आल्याने तो घराबाहेर पडला. कासमवाडीतील मैदानावर रात्री बरेच गुंड आणि टवाळखोर तरुण बसलेले असतात. परिसरातील नागरिकांनी देखील याबाबत अनेक वेळा तक्रार दिली आहे. मैदानावर त्याची कुणीतरी दगडाने ठेचून त्याची हत्त्या केली.आज सकाळी हा प्रकार लक्षात आला. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्यासह पथक पोहचले हा खून कोणी व का केला याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपास करीत आहेत. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला
सागर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असल्याचे समजते. पोलिसांना दोन संशयितांची नावे समजली असून त्यांचा शोध सुरू आहे. घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ देखील पोहचले.