नवी दिल्ली (वृत्तसंस्था) –निदर्शक शेतकऱ्यांच्या ठिकाणी अधिक बॅरिकेडस् लावणे आणि इंटरनेटसेवा खंडित करणे हा कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा स्थानिक प्रशासनाशी निगडीत असल्याचे सांगून केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला.

सरकार पुढील अधिकृत चर्चा कधी करणार आहे का सरकार आंदोलकांशी अनौपचारिक चर्चा करत आहे? असे विचारता तोमर म्हणाले, ‘नाही आम्ही शेतकऱ्यांशी कोणतीही अनौपचारिक चर्चा करत नाही.’
पोलिसांकडून होणारा छळ थांबवल्याशिवाय आम्ही चर्चा करणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे, याकडे तोमर यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘त्यांनी पोलिस आयुक्तांशी बोलावे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर कोणतेही भाष्य करण्याची माझी इच्छा नाही. ते माझे कामही नाही.’







