इस्लामाबाद (वृत्तसंस्था) – पाकिस्तानमध्ये करोनाचे रुग्ण वाढतच आहेत. करोनाच्या साथीला नियंत्रणात आणण्यासाठी देशभरात केले जात असलेल्या उपाय योजनांना पुरेसे यश मिळालेले नाही. अशातच आता पाक सरकारने पुढील वर्षीपासून करोना विरोधी लसीकरण सुरू करण्याची घोषणा करून टाकली आहे.
पुढील वर्षी एप्रिल महिन्यापासून देशातील सर्व नागरिकांना करोना विरोधी लस दिली जाईल आणि ही लस पूर्णपणे मोफत असेल असे आरोग्य सचिव नौशीन हमिद यांनी सांगितले आहे. मंगळवारी पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने करोना विरोधी लस खरेदी करण्यासाठी 150 दशलक्ष डॉलरचा निधी मंजूर केला आहे.
‘पाकिस्तानातील तेहरीक-ए-इंसाफ सरकारने लसीचे डोस खरेदी करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. ‘पीटीआय’ सरकार लोकांना करोना विषाणूविरोधी लस विनामूल्य उपलब्ध करुन देईल. सरकार 2021 च्या दुसरया तिमाहीत लसीकरण सुरू करेल.’असे ट्विट हमिद यांनी केले आहे.
चीनच्या लसीच्या वैद्यकीय चाचण्यांचा तिसरा टप्पा व्यवस्थित सुरू असून ही लस नागरिकांसाठी लवकरच उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तानमधील करोनाबाधितांची संख्या 44 लाखांवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात तेथे 3,499 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 39 जण मृत्यूमुखी पडले आहेत. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 8,205 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.