मुंबई (वृत्तसंथा) – राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघासाठी आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 1 डिसेंबरला मतदान झालं. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे. आज या निवडणुकांची मतमोजणी होत असून धुळे नंदुरबारमध्ये भाजपच्या अमरीश पटेलांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने ताकद पणाला लावली होती. विधानपरिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम दिसून येतील.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी 2 लाख 47 हजार 917 तर शिक्षकसाठी 53 हजार19 इतके मतदान झाले आहे. या सर्व मतपत्रिका एकत्र करून त्यातल्या वैध आणि अवैध मतपत्रिका वेगळ्या केल्या जात असतानाच विजयाचा कोटा ठरण्यासाठी रात्रीचे नऊ वाजू शकतात,असे विभागीय आयुक्तांनी सांगितले असून जर या प्रक्रियेत एखाद्या उमेदवाराने विजया साठीचा कोटा पूर्ण केला तर शिक्षक चा निकाल साधारण सायंकाळी 7 वाजता तर पदवीधर चा निकाल रात्री नऊ वाजता लागू शकतो. पहिल्या पसंतीच्या मतामध्येच विजय मिळवण्यासाठी वैध मतदान भागिले 2, अधिक 1 मत आवश्यक आहे. त्यामुळे एकतर्फी निवडणूक झाल्यास रात्री नऊ वाजता निकाल अपेक्षित आहे. पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण होऊ शकला नाही तर दुसऱ्या पसंतीची मते मोजली जाणार आहेत आणि ही प्रक्रिया करण्याची वेळ आल्यास त्याच्या पदवीधर साठी 60 फेऱ्या तर शिक्षक साठी 32 फेऱ्या घ्याव्या लागणार आहेत. प्रत्येक फेरीसाठी अंदाजे अर्धा तास वेळ गृहीत धरल्यास निकाल लागण्यासाठी आज रात्री 9 नंतर पुढे 30 तास पदवीधरसाठी लागू शकतात तर शिक्षक साठी 16 तास लागू शकतात असा प्रशासनाचा अंदाज आहे.