जळगाव ( प्रतिनिधी ) – भरपूर नफ्यासाठी गुंतवणूक करण्याचे सांगत व आमिष दाखवत भुसावळ येथील अभियंत्याची ८ लाख ८५ हजारात ऑनलाईन फसवणूक झाली जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
भुसावळ शहरातील शिवदत्त नगर येथे देवेंद्र मोतीराम सिडाम (वय-३३) हे वास्तव्यास आहेत. महावितरण कंपनीत ते सहाय्यक अभियंता आहेत . देवेंद्र सिडाम यांना २६ डिसेंबर २०२१ ते १० फेब्रुवारी २०२२ दरम्यान विविध अनोळखी व्यक्तींनी वेगवेगळया मोबाईल क्रमांकावरुन संपर्क साधला. गोल्डबार्स मध्ये ट्रेडिंग केल्यास तुम्हाला चांगला नफा मिळेल अशी बतावणी संबंधितांनी केली. यावर विश्वास ठेवत देवेंद्र सिडाम यांनी ८ लाख ८५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर २५ लाख रुपयांचा नफा झाल्याचेही संबंधित अनोळखींनी फोनवरुन सिडाम यांना सांगितले. मात्र प्रत्यक्षात आजपावेतो कुठल्याही नफ्याची रक्कम मिळाली नाही. तसेच गुंतवणूक केलेले ८ लाख ८५ हजार रुपये न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. २ एप्रिल रोजी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.