नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारताचा पाकिस्तानवर किती दरारा आहे हे दर्शविणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तानच्या संसदेमध्ये खुलासा करताना भारतीय फायटर प्लेनचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासंदर्भातील प्रकरणावर भाष्य केले. यामध्ये त्यांनी भारत आपल्यावर हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकत अभिनंदन यांची सुटका केल्याचा दावा केला आहे. यावरून भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हंटले कि, काँग्रेसच्या राजकुमाराला भारताच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास नाही. मग ते सरकार असो, सैन्य असो कि आमची लोक. यामुळे त्यांनी त्यांच्या सर्वात विश्वासार्ह देश पाकिस्तानचे ऐकले पाहिजे. आता त्यांचे डोळे उघडतील, अशी आशा आहे.
तसेच, काँग्रेस आपल्या सैन्याला कमकुवत करण्याचा प्रचार करत आहे. कधी त्यांची थट्टा केली तर कधी त्यांच्या वीरतेवर संशय घेतला. सैन्याला अत्याधुनिक राफेल मिळू नये यासाठी सर्व प्रकारच्या युक्त्या केल्या. परंतु, देशवासियांनी अशा राजकारणाला नाकारून काँग्रेसला अद्दल घडवली आहे, अशी टीका जे.पी. नड्डा यांनी केली आहे.







