मुंबई (वृत्तसंस्था) – ‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वांनी रस्त्यावर उतरावे’, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाब्दिक चिमटा काढला आहे. ‘चंद्रकांत पाटील म्हणतात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वांनी रस्त्यावर उतरा. मग आम्हा सगळ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल. कारण आम्हीही मराठाच आहोत’, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधताना अजित पवार म्हणाले, ‘काही लोकांना आंदोलन करण्याची हौस असते. कुणी आंदोलन केले की ते लोक त्याला पाठिंबा देतात. अरे पण आंदोलन कशासाठी आहे? का ? मार्ग काही निघतो का? काहीच माहिती हे लोक घेत नाहीत’, असा टोला अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना नाव न घेता लगावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी संभाजीराजेंच्या भूमीमेवरही भाष्य केले आहे. पत्रकार परिषदेत आज (२८ मे) संभाजीराजे म्हणाले की, ‘मराठा आरक्षणासाठी मी सुचविलेल्या निर्णय घेतला नाही तर ६ जूननंतर मी स्वत: रायगडावरून आंदोलनाचा इशारा देईन’, असा इशारा संभाजीराजेंनी दिला. त्यावर अजित पवार म्हणाले की, ‘आंदोलनाला अजून ९ दिवस बाकी आहेत. तोपर्यंत मार्ग निघेल’, असे अजित पवार म्हणाले. पुणे विभागाच्या कोरोना बैठकीनंतर ते बोलत होते.
अजित पवार संभाजीराजेंनी दिलेल्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया देताना आश्वासन देत म्हणाले की, ‘मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे संभाजीराजेंना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही.’







