जामनेर ( प्रतिनिधी ) – शेंदुर्णी मालखेडा रस्त्यावरील शेतात मादी बिबट्या शिरल्याचे दिसताच शेतमजुरांनी तिला पळविण्याचा प्रयत्न केला या झटापटीत तिने एका मजुरावर प्राणघातक हल्ला करून जखमी केले. इतर नागरीकांनी बिबट्याच्या तावडीतुन त्याची कशीबशी सुटका केल्याने अनर्थ टळला.
बिबट्याने हल्ला केल्याची माहिती वन विभागाला कळविली असता वनविभागाचे कर्मचारी हजर होऊन त्यांनी शिवाराची पहाणी केली. तोपर्यंत बिबट्या केळीच्या बागेत शिरला. वन विभागाने सदर बिबट्या मादी असुन गर्भवती असल्याचा निष्कर्ष तीच्या हालचालींवरून काढला. बिबट्या मादी पिल्लांना जन्म देण्यासाठी सुरक्षित जागा शोधतात, त्यामुळे येथे आली असल्याचे कर्मचा-यांनी सांगितले. वनपाल प्रकाश देवरे, वनरक्षक वाय.एच. साळूंखे, प्रकाश सुर्यवंशी, सचिन कुमावत आदी उपस्थित होते .
बिबट्याला पकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे. कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी कोणतेही साहित्य सोबत आणले नाही. नियमांची आडकाठी पुढे करून असमर्थता दर्शविल्याने एखाद्याचा जीव जाण्याची वाट बघत असल्याचा आरोप करत नागरीकांनी संताप व्यक्त केला. सध्या पेरणीची कामे सुरु आहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.