मुंबई (वृत्तसंस्था) – काँग्रेस नेते राजीव सातव यांना व्हेंटिलेटरवर उपचार सुरु आहेत. तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची प्रकृती पुण्यातच स्थिर करून उपचार केले जातील. अगदीच गरज लागली तर त्यांना मुंबईला हरवले जाईल असे राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते डॉ. विश्वजीत कदम यांनी पत्रकारांना सांगितले. सातव उपचाराला प्रतिसाद देत असून लवकरच ते आजारातून बाहेर येतील असा विश्वास देखील कदम यांनी व्यक्त केला.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसांपासून राजीव सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपचारासाठी आवश्यक ती मदत करू असे सांगितले आहे. दिल्ली आणि मुंबईतील वैद्यकीय तज्ञाचे सल्लामसलत करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज जहांगीर हॉस्पिटल ला भेट दिली.
राजीव सातव यांना 19 एप्रिल रोजी कोरोना ची लक्षणे दिसून आली. 23 एप्रिल रोजी त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 25 एप्रिल पर्यंत त्यांची प्रकृती चांगली होती उपचारांना प्रतिसाद देत होते मात्र त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले. कालपासून त्यांच्यावर व्हेंटिलेटरद्वारे उपचार सुरू आहेत, असे कदम यांनी सांगितले.
राजीव सातव हे प्रचंड इच्छाशक्ती असलेली व्यक्ती आहेत. उपचाराला प्रतिसाद देत असून लवकरच ते आजारातून बाहेर येतील असा विश्वास विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला.







