नवी मुंबई (वृत्तसंस्था) – सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची सुनावणी चार आठवडे तहकूब करण्यात आली. यानंतर राज्य सरकारच्या भूमिकेवर मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. मुंबईत चेंबूर आणि बोरिवली येथे मराठा समाजाने आंदोलन केले. यावेळी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात घोषणाबाजी आणि राजीनाम्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

बोरिवली तहसीलदार कार्यालयाबाहेर मराठा क्रांती मोर्चाने अशोक चव्हाण यांच्याविरोधात आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी आणि उपसमिती अध्यक्ष व राज्याच्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली. अशोक चव्हाण यांनी केलेले विधान मराठा समाजाचा अपमान करणारे असल्याचे आंदोलक अमोल जाधवराव यांनी सांगितले.
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने चेंबूर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येत असून सरकारचा निषेध व्यक्त केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाची सुनावणी आता चार आठवडे पुढे गेली आहे. सरकार योग्य बाजू मांडत नाही म्हणून ही वेळ आली आहे, असा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे, सरकारचा निषेध करण्यासाठी आज अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाला आज पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ या सरकारने आणलेली आहे, कोर्टामध्ये मराठा आरक्षण टिकविण्यासाठी सरकारने काहीच प्रयत्न केले नाहीत. मराठा उपसमिती निवडली गेली आहे मात्र, ते गेल्या चार महिन्यांपासून काहीच करू शकले नाहीत. आता त्याच्यांकडून काही अपेक्षा राहील नसल्याचं मत मोर्चेकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आले. आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचं तीव्र करणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
‘मराठा आरक्षणावरील सुनावणी ही खंडपीठाकडे न घेता ती घटनापीठाकडे व्हावी, अशाप्रकराची आमची भूमिका आहे. तशीच भूमिका आज सर्वोच्च न्यायालयात मांडली जाईल. हा विषय घटनापिठाकडे जावा, असाच युक्तिवाद केला जाईल, अशी आमची भूमिका आहे.’ असे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले होते. तसेच, मराठा आरक्षणाबाबत काही जण राजकारण करत आहेत. जर त्यांना सरकारवर विश्वास नसेल तर त्यांनी त्यांचा वकील जरुर लावावा, असे चव्हाण म्हणाले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्य मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांवर पोलिसांनी पाळत ठेवली आहे. समन्वयकांना 149 च्या नोटिसा बजावल्या आहेत. शरद पवार यांच्या दौऱ्यात मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत कोणतंही आंदोलन होऊ नये, यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. मराठा समाजाचे कार्यकर्ते कोणतेही आंदोलन करणार नाहीत. मात्र, राज्य सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप समन्वयकांनी केला आहे.







