नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – उत्तर प्रदेशातील ललितपूरमधून एका तीन वर्षांच्या मुलीचं कथितरीत्या अपहरण झालं. ‘अपहरणकर्ता’ तिला रेल्वे स्टेशनवर घेऊन गेला आणि भोपाळला जाणाऱ्या रेल्वेत चढला. मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली.

मुलीला सोडवता यावं यासाठी पोलिसांनी रेल्वे प्रशासनाला विनंती करून गाडी थेट भोपाळमध्ये थांबवली आणि या मुलीला सुखरूप सोडवलं, तिच्या अपहरणकर्त्यालाही ताब्यात घेतलं. पण त्यानंतर जे समोर आलं त्याने पोलीस पुरते चक्रावून गेले.
ललितपूरचे पोलीस अधिक्षक मिर्झा मंझर बेग यांनी बीबीसीला सांगितलं, “रविवारी संध्याकाळी एका महिलेने रेल्वे स्टेशनवर येऊन पोलिसांना माहिती दिली की तिच्या तीन वर्षांच्या मुलीचं अपहरण झालंय. अपहरणकर्त्याला तिने रेल्वेत बसताना पाहिलं असंही ती म्हणाली.
“या महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एक माणूस या मुलीला घेऊन राप्ती सागर एक्सप्रेसमध्ये बसताना आढळून आला. मग असं ठरलं की भोपाळपर्यंत ही रेल्वे विनाथांबा चालवायची जेणेकरून या माणसाला मुलीसह भोपाळमध्ये ताब्यात घेता येईल,” बेग यांनी सांगितलं.
मुलगी घरात नाही पाहिल्यावर कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. एक माणूस मुलीला घेऊन गेल्याची माहिती त्यांनी घराजवळच असलेल्या ललितपूर स्टेशनवरच्या आरपीएफ जवानांना दिली. सीसीटीव्हीत त्या मुलीला घेऊन एक माणूस रेल्वेत बसलेला दिसला. पण काही करण्यापूर्वीच रेल्वेने स्थानक सोडलं होतं.
या सर्व प्रकरणाची माहिती झाशीच्या आरपीएफ इन्सपेक्टरला दिली गेली आणि भोपाळच्या ऑपरेटिंग कंट्रोल रुमलाही सतर्क केलं गेलं. आरपीएफने रेल्वे प्रशासनाला विनंती केली की गाडी भोपाळपर्यंत कुठेही थांबवली जाऊ नये जेणेकरून मुलीला सुरक्षितपणे सोडवता येईल.
अपहरणकर्त्याला पकडण्यासाठी आणि एखाद्या लहान मुलीला सोडवण्यासाठी एखादी रेल्वे विनाथांबा धावण्याची ही भारतीय रेल्वेच्या इतिहासातली पहिलीच घटना असावी. राप्ती सागर एक्सप्रेस सुमारे 200 किलोमीटरचं अंतर कुठेही न थांबता धावली. या अंतरात गाडीचे अनेक नियोजित थांबे आहेत, पण ते सगळे डावलून गाडी थेट भोपाळला गेली.
साधारण अडीच तासांनंतर गाडी भोपाळ स्थानकात पोहोचली तेव्हा पोलीस तिथे हजरच होते. ललितपूरचे पोलीस अधिक्षक बेग सांगतात, “ट्रेनमधून मुलीला आणि तिला घेऊन जाणाऱ्या माणसाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर आम्हाला कळलं की तो दुसरा-तिसरा कुणी नाही तर त्या मुलीचा पिता होता. नवरा-बायकोमध्ये भांडण झालं होतं ज्यानंतर तो माणूस आपल्या मुलीला घेऊन घरातून निघून गेला होता. पण त्या महिलेने पोलिसांना हे सांगितलं नव्हतं की तिच्या मुलीला घेऊन जाणारा माणूस तिचा नवरा आहे.”
गाडी भोपाळ स्थानकात पोहोचताच पोलिसांनी ‘अपहरणकर्ता’ आणि मुलीला शोधून ताब्यात घेतलं. तो त्या मुलीचा पिता आहे कळल्यावर पोलिसांनी बंदोबस्तातच त्या दोघांना पुन्हा ललितपूरला रवाना केलं. पोलीस अधिक्षक बेग यांनी दिलेल्या माहितीनुसार ललितपूरला पोहोचल्यावर सर्व नातेवाईकांची एकमेकांशी गाठ घालून दिली गेली. पण या सगळ्या प्रकाराबद्दल मुलीचे आई किंवा वडील काहीही बोलायला तयार नाहीत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीचे वडील लक्ष्मी नारायण ललितपूरच्या आझाजपुरा भागात भाड्याच्या घरात राहतात. नवरा बायकोमध्ये कुठल्याशा कारणावरून वाद झाला आणि लक्ष्मी नारायण अंगणात खेळत असलेल्या आपल्या मुलीला घेऊन घरातून निघून गेले.
त्यांचं घर रेल्वे स्टेशनजवळच असल्याने मुलीच्या आईने आणि इतरांनी लक्ष्मी नारायण यांचा रेल्वे स्टेशनपर्यंत पाठलाग केला. पण मुलीच्या आईचं म्हणणं आहे की आपला पतीच मुलीला घेऊन गेलाय हे तिला माहीत नव्हतं.







