मुंबई (वृत्तसंस्था) – मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका बसल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. मराठा आरक्षणाच्या Maratha reservation मुद्यावरुन भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यव्यापी दौरा सुरु केला आहे. या दौऱ्यादरम्यान ते अनेक पक्षांच्या नेत्यांना भेटत आहेत. आज ते देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वर्षा या शासकीय निवासस्थानी गेले आहेत. दरम्यान खा. संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावर माजी खासदार नितेश राणे यांनी टीका केली होती. यानंतर आता नारायण राणे यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

नारायण राणे म्हणाले की, संभाजीराजे ज्यांच्या दारी फिरत आहेत, त्यांनी काय केलं. शरद पवार राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी काय केलं, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. तर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणासंदर्भात सांगणार का ? असा सवाल करत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकार गंभीर नाही असं संभाजीराजे म्हणाले. मात्र ज्यांनी खासदारकी दिली त्यांच्याबाबत असं वक्तव्य करणं योग्य नसल्याचे नारायण राणे म्हणाले. मराठा समाजाला भाजप सरकारने आरक्षण दिले होते. मात्र ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही. स्वत: उद्धव ठाकरे हे मराठा समाज्याला आरक्षण द्यावं या मताचे नाहीत, असे नारायण राणे म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन खासदार संभाजीराजे राज्यातील अनेक नेत्यांना भेटत आहेत. आज ते मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहेत. सकाळी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली. उद्या ते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत.







