जळगाव (प्रतिनिधी) – पाचोरा, चाळीसगाव, भडगाव तालुक्यात बिबट्याने हैदोस घातला असून शेतकरी मोठ्या प्रमाणात धास्तावले आहेत. शनिवारी एका बिबट्याने भडगाव तालुक्यातील गुढे येथील एका वासराचा फडशा पाडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वनविभागापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
गुढे, बहाळ, जूवंडी शेतशिवारात शनिवारी बिबट्याचा वावर आढळून आला. त्यात गुढे येथील बापू पाटील या शेतकऱ्याच्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश करून वासराचा फडशा पाडला. सकाळी शेतकरी शेतावर आल्यावर त्याला हि घटना समजली. त्यानुसार पोलिसांना कळविण्यात आले. बिबट्यामुळे शेतात जावे कि नाही हा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. अनेक शेतकरी रात्री शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.