चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरात मालेगाव रोड परिसरात धावत्या रस्त्यावर म्हशीच्या ३० रेडकूंची अवैधपणे वाहतूक करताना पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. रेडकूंची सुटका करीत दोन जणांना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. ५ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र बच्छे यांनी फिर्याद दिली आहे. शहरात मालेगाव रोड परिसरात २७ मे रोजी दुपारी २. ३० वाजता आयशर वाहनातून (क्र. एमएच ४३ एफ ४२९९) अवैधपणे गुरे वाहतूक होत असल्याबाबत ते वाहन पोलिसांनी थांबविले. त्यात विनापरवाना बेकायदेशीरपणे म्हशीचे ३० रेडकू दाटीवाटीने भरलेले दिसून आले. त्यामुळे आयशर वाहनासह चालक मोबीन खान सलीम खान (वय ३२, चौधरीवाडा, चाळीसगाव) व क्लिनर शेख फिरोजोद्दीन शेख चिरागोद्दीन (वय ३६, रा. गणेश नगर, मालेगाव) यांना अटक करण्यात आली आहे. तपास पोउनि सुहास आव्हाड पाटील करीत आहे.