जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील देवगाव येथील तरूणाचा विजेच्या धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरूवार २६ जानेवारी रोजी रात्री उशीरापर्यंत जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील देवगाव येथील हितेश शंकर सोनवणे (वय-२०, रा.देवगाव, ता.जि. जळगाव) हा आपल्या परिवारासह राहायला होता. गुरूवार २६ जानेवारी रोजी अंधारामुळे त्याला अंदाज न आल्याने तो इलेक्ट्रिक डीपीवर धडकला. यात त्याला विजेचा जोरदार धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. या संदर्भात गुरुवार 26 जानेवारी रोजी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल पेगडे करीत आहे.