रात्री शहरातून जाणारी अवजड व अवैध वाहतूक करणारी वाहने केली जमा
चाळीसगाव;- शहरातून अवजड वाहनांचा शहर वासीयांना होणारा त्रास काही नवीन नाही,
सदर वाहनांसाठी बायपास सारखा पर्याय असताना देखील शहरातून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरूच होती. यामुळे अनेकदा अपघात होऊन अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या होत्या. त्याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस प्रशासनाला सूचना देऊनही कठोर कारवाई होत नसल्याने अखेर आमदारांनी आज कडक एक्शन मोडमध्ये येत भाजपच्या पदाधिकारी यांच्या साथीने शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना अडवायला सुरुवात केली. शहरात येणार प्रत्येक अवजड वाहन आमदार मंगेश चव्हाण व कार्यकर्त्यांनी साईड ला लावत इतर वाहनांना रस्ता मोकळा करून दिला. अवघ्या तासाभरात काही किलोमीटर अवजड वाहनांच्या रांगा लागल्याने ही चोरटी वाहतूक किती मोठ्या प्रमाणात शहरातून होत होती ते लक्षात येते. आमदारांच्या आक्रमक पवित्र्याने पोलीस प्रशासन खडबडून जागे होत रस्त्यावर धाव घेतली. या धक्कादायक प्रकार म्हणजे अनेक वाहन चालक मध्यधुंद अवस्थेत होते तर काही वाहनांमध्ये रेती आढळून आली तर काही वाहनांची कागदपत्रे उपलब्ध नव्हती.
आमदार मंगेश चव्हाण यांनी तात्काळ आदेश देत सर्व वाहने जप्त करून उद्या सकाळी वाहनचालक यांची वैद्यकीय तपासणी, वाहनांच्या कागदपत्रांची आरटीओ मार्फत चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान आमदारांच्या कडक भूमिकेमुळे अवजड व अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले असून शहरवासीयांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.