नवी दिल्ली (वृत्तसंथा) – हरियाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. परीक्षा देऊन बाहेर पडलेल्या २० वर्षीय तरुणीवर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
माहितीनुसार, निकिता तोमर असे मृत तरुणीचे नाव आहे. अग्रवाल कॉलेजमध्ये बी.कॉमच्या अंतिम वर्षात ती शिकत होती. परीक्षा देऊन निकिता आपल्या मैत्रिणीसोबत कॉलेजच्या गेटवर आली. तेथे एक चारचाकी गाडी आधीपासूनच थांबली होती. यामध्ये दोन तरुण बसले होते.
निकिता बाहेर येताच यामधील एका तरुणाने तिला ओढून कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. परंतु, निकिताने विरोध करताच तिच्यावर गोळी झाडली. व दोन्ही आरोपींची कारमधून पलायन केले. छातीत गोळी लागल्याने निकिताचा मृत्यू झाला. दरम्यान, निकिताच्या कुटुंबियांनी धरणे आंदोलन सुरु केले असून आरोपींचा एन्काउंटर करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाला लव्ह जिहादचाही अँगल देण्यात येत आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, निकिता यातील एक आरोपीसोबत दहावीपर्यंत एकत्र शिकली होती. तरुण मैत्रीसाठी तिच्यावर दबाव टाकत होता. परंतु, निकिताने स्पष्ट नकार दिला होता.
स्थानिक पोलिसांनी हे प्रकरण एकतर्फी प्रेमातून घडले असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी तौफिक नामक युवकाला अटकही करण्यात आली असून त्याची चौकशी केली जात आहे. तसेच, दुसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, याआधीही २०१७ साली निकिताचे अपहरण करण्यात आले होते. कुटुंबीयांनी तक्रारही दाखल केली होती. परंतु, त्या नंतर सामाजिक प्रतिष्ठेच्या भीतीने परस्पर संमतीने केस सोडविण्यात आली. परंतु, आरोपी निकिताला त्रास देतच होता.







