जळगाव (प्रतिनिधी) – सर्वसामान्य नागरीकाने आपले शासकीय काम करुन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची लाच देण्याची आवश्यकता नाही. परंतु काहीवेळेस सर्वसामान्य नागरीकांना असे वाटते की, सरकारी कार्यालयातील काम फक्त लाच दिल्यावरच कार्यान्वित होते. या धारणेला बदलण्याची गरज आहे. प्रत्येक नागरीक सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार नष्ट करण्यास मदत करु शकतात. भ्रष्टाचारासंबधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. असे आवाहन जी. एम.ठाकूर, पोलीस उप अधिक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव युनिटतर्फे २७ ऑक्टोबर ते दि. २ नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचार आणि अधिकारांच्या दुरुपयोगाविरोधात जनजागृती करण्यात येणार आहे. ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त हा सप्ताह साजरा करण्यात येत असून या आठवडा “ दक्षता जागृती सप्ताह” म्हणून ओळखला जातो. सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार आणि भ्रष्ट पध्दती नष्ट करण्यासाठी जागरुकता मोहिम राबविण्याचा या सप्ताहाचा हेतू आहे.
जळगाव जिल्ह्यात या सप्ताहात सुनिल कडासने, पोलीस अधिक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक, निलेश सोनवणे, अप्पर पोलीस अधीक्षक व दिनकर पिगळे, पोलीस उपअधीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली दक्षता जनजागृती सप्ताहातंर्गत भ्रष्टाचाराविरोधात जागरुकता करण्यात येणार आहे. नागरीकांनी लोकसेवकाबद्दल आपली काही तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक -१०६४, दुरध्वनी क्रमांक ०२५७-२२३५४७७ मोबाईल क्रमांक -९६०७५५६५५६ अथवा dvspacbjalgain@gmail.com या ई मेलवर करण्याचे आवाहनही ठाकूर यांनी केले आहे.







