जळगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलाच्या मराठा रेजिमेंट बटालियनचा जवान यश दिगंबर देशमुख दि. २६ नोव्हेंबर रोजी श्रीनगर येथे कर्तव्य बजावत असतांना शहीद झाला. त्याच्यावर उद्या दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.
श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलाचे जवान देशाचे रक्षण करीत होते, त्यावेळी अचानक आलेल्या तीन दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला होता. त्यात यश देशमुखसह उत्तरप्रदेशचा जवान शहीद झाला आहे. यश देशमुखच्या निधनामुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली असून शुक्रवारी पार्थिव नाशिक येथे विशेष विमानाने पोहोचणार असल्याचे माहिती मिळाल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, चाळीसगावचे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली आहे. पिंपळगावातील शासकीय जागेवर यश देशमुखच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह जिल्ह्यातील महत्वाचे पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवारी यश देशमुख याच्या घरी खा. उन्मेष पाटील, आ. मंगेश चव्हाण, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे आदी मान्यवरांनी भेट देऊन देशमुख कुटुंबियांचे सांत्वन केले.