अमळनेर (प्रतिनिधी) – एका महिलेची आई दवाखान्यामध्ये आजारी असल्यामुळे उपचार घेत होती. सदर महिला तिच्या नोकरीच्या ठिकाणी जात असताना कोर्ट चौकामध्ये अचानक ५०० रुपये किमतीच्या नऊ नोटा महिलेला सापडल्या. मात्र आर्थिक गरज असताना देखील पैशांचा मोह न बाळगता पैसे परत करण्याचा त्यांनी उद्देश ठेवला आणि एका गरीब टॅक्सी चालकाला त्याच्या खिशातून नजर चुकीने पडलेले पैसे मात्र परत मिळाले. या टॅक्सी चालकाने प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून देऊ केलेले एक हजार रुपये देखील सदर महिलेने नाकारले. या अनोख्या भावपूर्ण प्रसंगाचे साक्षीदार व मध्यस्थी ठरले ते मात्र अमळनेर पोलीस स्टेशन…
अमळनेर शहरातील कुंभार टेक भागातील रहिवासी ललिता चंद्रशेखर सोनार या कामाच्या ठिकाणी श्री गणेश पॅथॉलॉजी लॅब येथे जात होत्या. त्यावेळी कोर्ट चौकामध्ये त्यांना बसस्थानकासमोर पाचशे रुपये किमतीच्या नऊ नोटांचे बंडल सापडले. आजूबाजूला कोणीच नव्हते. त्यामुळे त्यांनी श्री गणेश पॅथॉलॉजी येथे गेल्यावर तेथील संचालक सुनील पाटील यांना पैशांबद्दल सांगून मला ते परत करायचे आहे असा उद्देश सांगितला.
सुनील पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक विजय शिंदे यांना संपर्क करून सदर रक्कम ही महिलेला परत द्यायची असल्याचे कळविले. त्यानुसार विजय शिंदे यांनी यंत्रणा कामाला लावून मूळ मालकाला शोधून काढले. पोलीस नाईक मिलिंद भामरे यांनी बस स्थानक परिसरात जाऊन तपास केला. त्या ठिकाणी इस्लामपुरा भागातील टॅक्सी चालक कमरुद्दीन शेख अहमद (वय ६८) यांनी त्यांच्या महत्त्वाच्या कामासाठी उधार घेतलेले पैसे खिशातून हातरुमाल काढीत असताना कुठेतरी पडल्याचे कळाले. त्यानुसार कमरुद्दीन शेख यांना संपर्क साधून बोलविण्यात आले.
पोलीस स्टेशन येथे कमरुद्दीन शेख यांना ललिता सोनार यांनी त्यांचे हरवलेले ४ हजार ५०० रुपये परत देण्यात आले. यावेळी टॅक्सी चालक कमरुद्दीन यांना गहिवरून आले. त्यांनी थरथरते हाताने आशीर्वाद देऊन त्यातील बक्षीस म्हणून १ हजार् रुपये ललिता सोनार यांना देऊ केले. मात्र त्यांनी प्रामाणिकपणे हात जोडून नम्र नकार दिला. ललिता सोनार यांच्या आई डॉ. बहुगुने यांच्याकडे उपचारासाठी दाखल आहेत. जगभरात लोक पैशानमागे धावत असताना तसेच एकाच घरात सख्खे भाऊ पैशांसाठी भांडत असताना समाजामध्ये प्रामाणिक लोक अजुनहि आहेत, याची प्रचिती या निमित्ताने आली. दरम्यान घटनेची दिवसभर अमळनेर शहरात चर्चा होती.