बीजिंग (वृत्तसंस्था)- चीनच्या उत्तरेकडील भागात सुरू असलेल्या युद्धसरावामुळे हवाई क्षेत्रावर निर्बंध लागू असतानाही या प्रतिबंधित क्षेत्रात अमेरिकेच्या यु-2 या टेहळणी विमानाने घुसखोरी केल्याबद्दल चीनकडून थयथयाट सुरू झाला आहे.

अमेरिकेची ही कृती मुद्दाम केलेली कुरापत आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रवक्त्या वु कियान यांच्या हवाल्याने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अमेरिकेच्या या कृत्याचा चीन निषेध करत असून अमेरिकेने अशा प्रकारची घुसखोरी करणे तातडीने थांबवावे, असेही या निवेदनात वु कियान यांनी म्हटले आहे.
हा युद्धसराव चीनच्या उत्तरेकडील विभागाकडून केला जात होता, असे या निवेदनात म्हटले आहे. मात्र, या युद्धसरावाचा अन्य कोणताही तपशील या निवेदनात देण्यात आलेला नाही. मात्र, हा युद्धसराव सोमवारी सुरू झाला असून बीजिंगच्या पूर्वेकडील बोहाई आखातामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत चालणार असल्याचे सागरी सुरक्षा व्यवस्थापनाने म्हटले आहे.
व्यापार, तंत्रज्ञान, तैवान आणि दक्षिण चीन समुद्राशी संबंधित मुद्द्यांवरून अमेरिका आणि चीनमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. साम्यवादी राजवट असलेल्या चीन आणि रशियातील अनेक ठिकाणी अमेरिकेच्या विमानांच्या घिरट्या घातल्याची अनेक उदाहरणे अलीकडच्या काळात घडली आहेत.







