मुंबई ( प्रतिनिधी ) – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांना माहिती दिली. त्यांनी राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्क सक्ती होऊ शकते, असे संकेतही दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असून, या बैठकीनंतर या संदर्भातील निर्णय होऊ शकतो, असंही ते म्हणाले.
“आज मुख्यमंत्री सांयकाळी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. कदाचित गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क अनिवार्य होऊ शकतात. असा या बैठकीनंतर निर्णय होऊ शकतो. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालायला हवेत. त्या दृष्टीने एक साधारण चर्चा झाली आहे.” असे आरोग्यमंत्री टोपेंनी सांगितले.
राजेश टोपे म्हणाले की, “प्रामुख्याने पंचसूत्री जी आहे त्यानुसार कार्यवाही करणे गरजेचे आहे आम्ही असं ठवरलं आहे की, पहिलं सूत्र म्हणजे तपासण्या, तर आज आपण २५ हजारांपर्यंत दररोज तपासण्या करत आहोत. ही २५ हजारांची तपासणी आम्ही निश्चितपणे वाढवू. कारण, किरकोळ स्वरुपात… महाराष्ट्र हे तसं जर पाहिलं तर मी म्हणेण खूप सुरक्षित झोनमध्ये आहे. चिंता करण्याची परिस्थिती अजिबात नाही आणि घाबरण्याचं देखील काही कारण नाही. याचं कारण म्हणजे ९२९ आज अॅक्टीव्ह केसेस आहेत, महाराष्ट्राने एका एका दिवशी ६५ ते ७० हजार केसेस बघितलेल्या आहेत. दर दहा लाखांमागे महाराष्ट्रात सात केसेस आहेत.
आपल्या देशात तरी ओमायक्रॉनच सर्वदूर आहे. जरी त्याचे काही व्हेरिएंट्स जरी असले तरी, ते ओमायक्रॉनचेच खऱ्या अर्थाने भाग आहेत. म्हणून तसा काही वेगळा व्हेरिएंट निर्माण झालाय, असा काही भाग नाही. परंतु तरी देखील जिनोमिक सिक्वेन्सिंग करायला सांगितलं आहे, ते देखील आम्ही करू.” अशी देखील माहिती आरोग्यमंत्री टोपेंनी दिली.
सहा ते १२ वयोगटासाठी लसीकरण करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिलेली आहे. त्यामुळे आता हे महाराष्ट्रासमोर पुन्हा एक मोठं काम, निश्चितप्रकारे आहे. त्या संदर्भातील विसृत नियमावली अद्याप पाठवलेली नाही. जसे ते येतील त्याची अंमलबजावणी राज्याच्या आरोग्य विभागाकडून केली जाईल. शाळा आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन लसीकरण वाढवावंच लागणार.” असंही राजेश टोपेंनी सांगितलं.